उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटके भरलेली बेवारस कार

0
230
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाल हिल भागातील अँटालिया निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली बेवारस कार आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस करत असून लवकरच सत्य समोर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

कंबाल हिल भागातील अल्टा माऊंट रोडवर मुकेश अंबानी यांचे अँटालिया हे बहुमजली अलिशान निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून काही अंतरावरच आज सायंकाळी हिरव्या रंगाची एक बेवारस स्कॉर्पियो कार उभी होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने या कारची तपासणी केली असता या कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या आढळून आल्या आहेत.

विशेष म्हणजे या स्कॉर्पियो कारचा नंबर खोडण्यात आला आहे. अँटालिया इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना या कारबाबत संशय आल्यामुळे त्यांनी तातडीने या कारबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने कारमधील स्फोटके निकामी करण्यात यश मिळवले आहे.

 ही कार कुणाची आहे? अंबानी यांच्या अँटालियापासून काही अंतरावरच ती उभी करण्याचा कोणाचा काय हेतू होता? आदी अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात असून पोलिस तपासात या सर्व बाबींची उलगडा होणार आहे.

सत्य बाहेर येईलः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा