मटन हलालचे आहे की झटक्याचे? हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मटन शॉपबाहेर फलक लावण्याचे फर्मान

0
434
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः आधुनिक विचारसरणीचा पुरस्कार करणारे शहर अशी ओळख सांगणाऱ्या दिल्लीच्या दक्षिण महानगरपालिकेचे एक नवे फर्मान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. भाजपची सत्ता असलेल्या या महानगरपालिकेच्या स्थायी समितीने हॉटेल, रेस्टॉरंट, मटन शॉपच्या बाहेर तेथे उपलब्ध असलेले मटन-चिकन हलाल केलेले आहे की झटक्याचे आहे, हे सांगणारा फलक लावण्याचा आदेश देणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. महानगरपालिका बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर या फर्मानाची अंमलबजावणी सुरू होईल.

हिंदू आणि शीख धर्मात हलाल केलेले मांस खाणे वर्ज्य असून ते या धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मटन शॉप्सना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मटक-चिकन हलाल केलेले आहे की झटक्याचे हे सांगणारे फलक लावावेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ९० टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मटन-चिकन वाढले जाते. मात्र ते मटन-चिकन हलाल केलेले आहे की झटक्याचे हे सांगितले जात नाही. त्याचप्रमाणे मटन शॉप्सही अशी माहिती देत नाहीत, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राजदूत गहलोत यांनी सांगितले की, समजा एखाद्या व्यक्तीला झटक्याचे मटन हवे असेल मात्र त्याला हलालचे मटन मिळाले तर त्याला वाईट वाटेल. त्यामुळेच मटन हलाल आहे की झटक्याचे हे सांगणारे फलक लावले पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दुसरे असे की जर मी झटक्याचा परवाना घेतला आहे आणि हलाल केलेले मटन विक्री करत असेल किंवा हलालचा परवाना घेतला असेल आणि झटक्याचे मटन विक्री करत असेल तर या निर्णयामुळे अशा अनियमितेला पायबंद घातला जाईल आणि परवान्यानुसार मांस विक्री केली जाईल, असेही गहलोत यांचे म्हणणे आहे.

यापूर्वी पूर्व दिल्ली महानगरपालिकेनेही २०१८ मध्ये असा प्रस्ताव मंजूर केला होता.  अनेक हिंदू हलाल केलेले मटन खात नाहीत. त्यामुळे इतरांच्या धार्मिक भावना दुखावू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला, असे तेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष सत्यपाल यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा