प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोकाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

0
37
संग्रहित छायाचित्र.

मुंबई पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्यांना आधी ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत आज ‘वर्षा’ वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंचगंगा नदीचे प्रदूषण आणि प्रदुषणाची समस्या दूर करण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी ठाकरे यांनी पंचगंगेबाबत दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदी उपास्थित होते. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या पथकांनी संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवावी. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकाणांवरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ठाकरे म्हणाले.

पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पूर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा