स्पेनमध्ये कोरोनाची दुसरी लाट, राष्ट्रीय आणीबाणी घोषित

0
595
प्रातिनिधिक छायाचित्र.

माद्रीदः जगात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात असतानाच ही दुसरी लाट स्पेनमध्ये येऊन धडकली असून संसर्ग रोखण्यासाठी स्पेन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून नवीन निर्बंध लागू केले आहेत.

स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. देशात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या काळात ही संचारबंदी लागू असेल.

स्थानिक परिस्थितीनुसार प्रशासनाला वेगवेगळे निर्बंध लागू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आणि संसर्गाचा वेग पाहून हे निर्बंध लागू केले जातील, असे पेद्रो म्हणाले. हे नवे नियम पंधरा दिवस ते सहा महिने कालावधीपर्यंत लागू राहतील.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी स्पेनमध्ये कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. स्पेनमध्ये आतापर्यंत ११ लाख १० हजार ३७२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून ३४ हजार ७५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, इटलीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे तेथेही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रविवारपासून हे निर्बंध लागू झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ लाख २५ हजार ७८२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३७ हजार ३३८ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील रुग्णसंख्या ७८ लाखांच्या पारः भारतातील कोरोना रुग्णसंख्येने ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशात ५० हजार १२९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६ लाख ६८ हजार १५४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा