त्सुनामी ठरू शकते कोरोनाची दुसरी लाट, बेफिकीर वागू नकाः मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

0
235
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही.  मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये. फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून  वाहून जाऊ शकते, असे ठाकरे म्हणाले.

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढताना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे हे आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात चालवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 400 जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेपः कोरोनाशी कडवा मुकाबला सुरु असताना महाराष्ट्राने अनलॉक काळात उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात १७ हजार तर दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आवश्यक असलेल्या जमीन आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाकाळात महाराष्ट्रात करण्यात आलेल्या उपाययोजना, राज्यातील जनतेचे सहकार्य आणि महाराष्ट्राची एकूण प्रतिमा याचे हे फलित आहे, असे ठाकरे म्हणाले.

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतरः दिवाळीनंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची, ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल परंतु मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचे हित जपणारच, ही ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा