नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्ताबदल भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसू लागला आहे. या सत्ताबदलात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानाची सुरक्षा मोदी सरकारने तडकाफडकी हटवली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत कपात करायची किंवा ती हटवायची झाल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना देण्यात येते. मात्र शरद पवारांची सुरक्षा हटवताना अशी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.
अतिमहत्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत सुरक्षा पुरवण्यात येते. शरद पवारांच्या नवी दिल्लीतील सहा जनपथ या निवासस्थानी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान सुरक्षेसाठी तैनात केले होते. ते आता काढून घेण्यात आले आहेत. सुरक्षा काढून घेताना केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणताही पूर्वकल्पना दिलेली नाही, असे शरद पवारांच्या नवी दिल्लीतील कार्यालायातून सांगण्यात आले. मोदी सरकाने याआधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी याची एसपीजी सुरक्षा काढून घेतली होती.
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजप आता सुडबुद्धीने वागत आहे. हे लोकशाहीला घातक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवल्यामुळे काही होणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केले तरी शरद पवार हे घाबरणाऱ्यातले गडी नाहीत. पवार सह्याद्रीचा पहाड आहेत. लोकांचे प्रेम, आपुलकी हेच शरद पवारांचे सुरक्षा कवच आहे, असे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.