अनिल देशमुख प्रकरणात परमबीर सिंगांचे वकील महेश जेठमलानी यांना राज्यसभेची खासदारकी!

0
975
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटींच्या वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून राजकीय खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेठमलानी यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले असून त्याबाबतचे राजपत्र आज प्रसिद्ध करण्यात आले.

 राज्यसभा सदस्य रघुनाथ महापात्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर महेश जेठमलानी यांना नामनिर्देशित करण्यात आले असून त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी १३ जुलै २०२४ पर्यंत राहणार आहे. महेश जेठमलानी हे दिग्गज वकील आणि भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील माजी कायदा मंत्री राम जेठमलानी यांचे चिरंजीव आहेत.

आयुक्त परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्याच परमबीर सिंगांची बाजू महेश जेठमलानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. परमबीर सिंगांची बाजू मांडणारे वकील भाजपशी संबंधित आहेत, त्यामुळे या एकूणच प्रकरणाला राजकीय वास असल्याचा आरोपही सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता.

महेश जेठमलानी हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याविरोधात उत्तर-मध्य मुंबईतून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर महेश जेठमलानी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा २०१२ मध्ये राजीनामा दिला होता.

 महेश जेठमलानी यांनी वकिलीचा ४० वर्षांचा अनुभव आहे. या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हाय प्रोफाईल क्रिमिनल आणि सिव्हिल केसेस लढवल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींच्या वतीन जेठमलानी हे कोर्टात हजर झाले होते.

प्रियवंदा बिर्ला प्रकरणात महेश जेठमलानी यांनी बिर्लांच्या वतीने बाजू मांडली होती. मारूती उद्योग प्रकरणात महेश जेठमलानी यांनी हर्षद मेहतांचे वकीलपत्र घेतले होते. ताज्या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी त्यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा