प्रशांत भूषण यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी आज दिली जाऊ शकते शिक्षा

0
69
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावू शकते. न्या. अरूण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने भूषण यांना दोषी ठरवले आहे. आता फक्त शिक्षा सुनावणे बाकी आहे. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती.

तत्पूर्वी प्रशांत भूषण यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. आपली वक्तव्ये सद्भवनापूर्वक होती आणि आपण जर माफी मागितली तर तो ज्या संस्थेवर ते सर्वोच्च विश्वास ठेवतात, त्या संस्थेचा आणि अंतरात्म्याचीही अवमानना होईल, असे प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात म्हटले होते.

२० ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना द्यावयच्या शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांना आपल्या वक्तव्यावर पूनर्विचार करण्यास सांगितले होते. त्यासाठी त्यांना सोमवारपर्यंत वेळ दिला होता.

या वर्षीच्या जून महिन्यात प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयावर दोन ट्विट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याची स्वतःहोऊन दखल घेत न्यायालयाची अवमानना केल्या प्रकरणी प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले होते आणि शिक्षा ठोठावण्यासाठी २० ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती. मात्र प्रशांत भूषण यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. विशेष म्हणजे अवमानना प्रकरणाची सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती अरूण मिश्रा २ सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा