महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत येईल ही अपेक्षाच बालिशपणाः खडसेंचा फडणवीसांना घरचा आहेर

3
4865
संग्रहित छायाचित्र.

जळगावः महाराष्ट्र भाजपमधील अंतर्कलह वाढत चालला असून महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल आणि महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता येईल, या आशेवर बसलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी खडेबोल सुनावले आहेत. सद्यस्थितीत राज्यात भाजपचे सरकार येईल अशी अपेक्षा ठेवणे बालिशपणाचे आहे, असे खडसे म्हणाले.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. सरकारच बनवायचे असेल तर एखाद-दुसरा आमदार नव्हे तर एका अख्ख्या पक्षाचेच भाजपमध्ये विलिनीकरण करावे लागेल, सध्या तरी ते शक्य नाही आणि तशी अपेक्षा ठेवणे हा बालिशपणा आहे, असे खडसे म्हणाले.

 खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेऊनही काही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले नाही. भाजपने स्वबळावर विधानसभा लढवली तेव्हा १२३ जागा जिंकल्या होत्या. मग शिवसेनेशी युती करून निवडणूक लढवल्यावर हा आकडा कमी कसा झाला? असा सवाल करतानाच हा सगळा फडणवीसांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. त्यांनी निवडणूक जिंकू शकणाऱ्या अनेक नेत्यांना तिकिटे दिली नाहीत. कारण त्या नेत्यांच्या वाढत्या उंचीमुळे फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका वाटत होता, असे खडसे म्हणाले.

हॅकर फडणवीसांना कसा भेटला?:  मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणूनच माझ्यावर दाऊद इब्राहीमच्या पत्नीशी फोनवर बोलल्याचे आणि जमीन घोटाळ्याचे आरोप ठेवण्यात आले. ज्या हॅकरने माझ्यावर दाऊदच्या पत्नीशी फोनवर बोलल्याचा आरोप केला होता आणि ज्या दिवशी माध्यमात ही बातमी चर्चेत आली, त्याच रात्री दीडवाजेच्या सुमारास तो हॅकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटला होता. त्याच्यासोबत माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंहही होते. त्या भेटीची छायाचित्रे माझ्याकडे आहेत, असे खडसे म्हणाले. माझ्या विरोधात कट रचण्यात आला. त्यावर मी आता ‘नानासाहेब फडणवीसांचे कारनामे’ हे पुस्तक लिहिणार आहे, असेही ते म्हणाले.

माझ्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात कुणीही आरोप केले नव्हते. माझ्याविरुद्ध रचलेल्या षडयंत्राची खडानखडा माहिती मला आहे. या षडयंत्रात कोणता मंत्री सहभागी होता, कोणत्या मंत्र्यांचा पीए अंजली दमानियांना भेटत होता या सगळ्यांचे व्हिडीओ फुटेज माझ्याकडे आहे. ते  मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आधीच दाखवले आहे. मंत्र्यांच्या पीएचे एका महिलेसोबतची आक्षेपार्ह छायाचित्रेही माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोटही खडसेंनी केला.

3 प्रतिक्रिया

 1. खडसे साहेब तुमचा वापर करुन झालेला आहे. आता यांचेकडुन काय अपेक्षा ठेवताय पक्षश्रेष्ठीचाच त्यांना अभय आहे त्यामुळे तक्रार कोणाकडे करनार .त्यामुळे आपन आपला वेगळं राजकारण करावं

  • खडसे साहेब आम्हाला तूमच्या बाबतीत सहानुभूती आहेच परंतु शीवसेनेला कमी लेखत युती तोडण्याचे पाप तुम्ही केल त्या गोष्टी च आजही दुखः वाटत हो

 2. भारतात दोन बाजू असलेली संघटना म्हणजे आरएसएस,
  पहिली बाजू म्हणजे सर्व भारतीयांना, कार्यकर्त्यांना भारतीयत्व, हिंदुत्व, याच्या मोहात पडायचे, खास करून बहुजन ओबीसी वर्गाला.
  मताच राजकारण, जातीच राजकारण, धर्माचं राजकारण, प्रांताच राजकारण, पाण्याचं राजकारण, अशा विविधांगी या ओबीसी समाजाला इमोशनल करायचे,
  प्रत्यक्ष सत्तेत महत्वाच्या पदावर नेमणूक करताना, निर्णय प्रक्रियेत या वर्गाला कधीही विश्वासात घेतले जात नाही.
  डावा व उजवा असे सरळ सरळ डाव खेळण्यात हे
  पटाइत असतात.
  सेक्युलर वाद, धर्मवाद असे सहजतेने बदलत असतात.
  दुसरी बाजू, त्यांना या देशातून जाती संपणार नाहीत व शिक्षणात कधी ही आत्मनिर्भर होणार नाहीत, सर्वात जास्त खर्च उच्च शिक्षणावर होत असताना,ही उच्च शिक्षण घेणारी पिढी मात्र नंतर संधी मिळत नसल्याने देशाबाहेर जाते. कारण देशातील उद्योजकांना देशात काहीही निर्मिती न करता बाहेरच्या देशातून आयात करत बुध्दी कौशल्य शिस्तबद्धता याला फाटा दिला जातो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा