सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले: देवेंद्र फडणवीसांवर खडसेंचे शरसंधान

0
330
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याची खेळी अंगलट येऊन भाजपची नाचक्की झाल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आता स्वपक्षीयांकडूनच उघड उघड बंडाचे आवाज उठू लागले असून त्यांच्या कार्यपद्धतीवरही टिकेची झोड उठवण्यात येत आहे. सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही केव्हाच रद्दीत विकले, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केली आहे.

नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसेंनी ही टीका केली. देवेंद्र फडणवीस आम्हाला सोबत घेऊन चालले नाही. मला, प्रकाश मेहता, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांनी बाजूला सारले. आम्हाला सोबत घेऊन गेले असते तर भाजपच्या नक्कीच 20 ते 25 जागा वाढल्या असत्या. मात्र ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत देवेंद्र फडणवीस का गेले? पक्ष चुकत नसतो. ज्यांच्याकडे धुरा दिली त्यांचे निर्णय चुकत असतात, अशा भाषेत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टिकेची झोड उठवली आहे. अजित पवारांशी हातमिळवणी करण्याच्या फडणवीसांच्या निर्णयावर तर ‘ सिंचन घोटाळ्याचे जे काही बैलगाडीभर पुरावे आम्ही गोळा केले होते, ते पुरावे आम्ही रद्दीत विकले. त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, अशा भाषेत त्यांनी शरसंधान केले. भाजपचे अन्य नेतेही दबक्या आवाजात फडणवीसांवर टिकास्त्र सोडत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा