‘हमारा बजाज’चा जनक हरपलाः ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

0
86
संग्रहित छायाचित्र.

पुणेः देशातील आघाडीच्या  बजाज उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी शाकयी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी झाला होता. वडिल कमलनयन बजाज यांच्याकडून त्यांना उद्योगाचा वारसा मिळाला होता.  राहुल बजाज यांनी हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली होती. राहुल बजाज यांनी तब्बल ४० वर्षे बजाज उद्योग समूहाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. १९६८ मध्ये ते बजाज उद्योग समूहात कार्यकारी अधिकारीपदावर रुजू झाले होते. वाहन उद्योगात बजाज ऑटोला मोठे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या वर्षी त्यांनी बजाज उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद नीजर बजाज यांच्याकडे आले आहे.

 राहुल बजाज यांच्या नेतृत्वात बजाज उद्योग समूहाने नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांच्याच नेतृत्वात कंपनीची उलाढाल ७.२ कोटींहून १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. दुचाकी वाहन उद्योगात देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मानही बजाज ऑटोला त्यांच्याच नेतृत्वात मिळाला. त्यांच्याच कार्यकाळात ‘हमारा बजाज…’ ही जाहिरातीची ट्यून घराघरात पोहोचली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 उद्योग क्षेत्रातील उल्लखनीय कामगिरीबद्दल त्यांना २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्कारान सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी २००६ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या बजाज यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्याचा परिणाम त्यांच्या ह्रदयक्रियेवर झाला. त्यामुळे प्रकृती खालावत गेली आणि दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

देशाभिमानी उद्योजक गमावला-मुख्यमंत्री ठाकरेः राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते. राहुल  बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा