महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार संजय पांडे यांच्याकडे!

0
102

मुंबईः भारतीय पोलिस सेवेतील ( आयपीएस) ज्येष्ठ अधिकारी संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. पांडे हे सध्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे महासंचालक आहेत.

१९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय पांडे हे प्रामाणिकपणाबद्दल ओळखले जातात. मात्र अनेक वर्षांपासून ते साइड पोस्टिंगवर फेकले गेलेले आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे महासंचालक आहेत. तत्पूर्वी ते होमगार्डचे महासंचालक होते.

महाराष्ट्र पोलिस दलात नुकत्याच करण्यात आलेल्या फेरबदलात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे ( एसीबी) महानिरीक्षक रजनीश सेठ यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.

गेल्या तीन महिन्यांत दोनवेळा संजय पांडे यांना पोलिस महासंचालकपदाने हुलकावणी दिली होती. त्याबाबत त्यांनी आपली जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. पहिल्यांदा सुबोध जैस्वाल यांनी आपला कार्यकाळ मध्येच सोडून डेप्युटेशनवर केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पोलिस महासंचालकपदाचा पदभार संजय पांडेंना मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या फेरबदलातही ही अपेक्षा होती. परंतु त्याही वेळी रजनीश सेठ यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालपदी अद्याप पूर्णवेळ नियुक्ती झालेली नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवल्यानंतर राज्य सरकार त्यापैकी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याची निवड करून पूर्णवेळ पोलिस महासंचालकाची नियुक्ती करू शकते. तोपर्यंत महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभारच राहणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा