भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात पहिल्या रांगेत खुर्ची नाकारली, खडसेंनी दिली बहिष्काराची धमकी

0
1096
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपच्या नवी मुंबईतील राज्यव्यापी अधिवेशनात खुर्चीचे राजकीय नाट्य चांगलेच रंगले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या अधिवेशनात पहिल्या रांगेत खुर्ची नाकारून दुसऱ्या रांगेतील खुर्ची देण्यात आल्याचे पाहून ते चांगलेच संतापले. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये दाखल झालेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी मंत्री गणेश नाईक मात्र पहिल्या रांगेत बसलेले होते. हे पाहून खडसेंनी अधिवेशनावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली, तेव्हा कुठे त्यांना पहिल्या रांगेतील खुर्ची देण्यात आली.

नवी मुंबईतील नेरूळ येथील भाजपच्या दोन दिवशीय राज्यव्यापी अधिवेशनात रविवारी खुले अधिवेशन घेण्यात आले. चंद्रकांत पाटलांनी दुसऱ्यांदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या सूत्रे स्वीकारली. २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डावलून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातल्यापासूनच खडसे पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. २०१६ मध्ये खडसेंना भोसरी येथील जमीन घोटाळाप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसेंना पक्षाने उमेदवारीही नाकारली आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. रोहिणी खडसेंच्या पराभवाला भाजपतील नेतेच जबाबदार असल्याचा आरोपही खडसे यांनी केला होता. तेव्हापासून खडसे भाजप नेत्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच रविवारी त्यांना दुसऱ्या रांगेत बसवून डावलण्यात आल्यामुळे ते चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट अधिवेशनावर बहिष्काराची धमकी दिली. तेव्हा कुठे त्यांना पहिल्या रांगेत बसू देण्यात आले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा