एकनाथ खडसेंचा भाजपला जयश्रीराम, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; मंत्रिपदही मिळणार!

0
535
संग्रहित छायाचित्र.

मुंबई महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग आणि अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटाशी लढाई सुरू असतानाच बुधवारचा दिवस भाजपसाठी धक्कादायक ठरला. उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. पक्षप्रवेशानंतर खडसेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली. खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचे आपल्याला सांगितले असून त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खडसे यांना अनेक वर्षांचा अनुभव असून त्यांना अनेक प्रश्नांची जाण आहे. महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांचा अभ्यास त्यांना आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर काम करताना त्यांनी पक्ष वाढवला. जेथे भाजपाचे कमी आमदार होते तेथे त्यांनी मेहनत घेत पक्षाचे आमदार वाढवले. पक्षाला मोठं करण्यात ज्यांनी मोठे योगदान दिलं त्यापैकी एक खडसे आहेत, असे कौतुकोद्गगार पाटील यांनी यावेळी काढले.

जबाबदारी कोणती?, योग्यवेळी निर्णयः खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची याबाबत पक्ष योग्यवेळी योग्य निर्णय घेईल. त्यांचा पक्षप्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. त्यांचा प्रवेश होतोय, त्यांच्या प्रवेशाची बातमी देतोय. ही एक सुखद बातमी आहे, असे पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. भाजपतून गेले काही वर्षे त्यांच्यावर अन्याय होतोय तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळया भागातील लोकांनी पाहिलाय. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे, असे खडसेंनी आपल्याला सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले.

भाजपाचे १० ते १२ आमदार संपर्कातः निवडणुकीच्या काळात गयारामांची चर्चा जास्त होती. आता आयारामांची संख्या वाढणार का?, असे विचारता जयंत पाटील म्हणाले, हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंसोबत येण्याची अनेक आमदारांची इच्छा आहे.  भाजपचे १० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबरोबर कोण येणार, कोण नाही याबाबत आम्ही त्यांच्याशी फार चर्चा केलेली नसली तरी येणाऱ्या व्यक्तीचे राष्ट्रवादी पक्षाशी, महाराष्ट्रातल्या जनतेशी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी किती जिव्हाळ्याने बांधिलकी आहे हे बघून आम्ही हळूहळू निर्णय घेतला जाईल. पण कोरोनाच्या काळात ताबडतोबीने विधानसभेच्या निवडणूका करण्याची आवश्यकता नाही आहे. जसजशी वेळ येत जाईल तसतसे त्या आमदारांचे निर्णय होतील, असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. खडसेंचे नेतृत्व मानणारे आणि ज्यांचा भाजपाकडून हिरमोड झालेला आहे, अशी लोक हळूहळू येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात मिळणार स्थानः एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांचे मंत्रिपद काढून ते खडसेंना देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जो मंत्री राजीनामा देणार त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले जाणार अशीही राष्ट्रवादीत चर्चा होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा