पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपलाः ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

0
127
संग्रहित छायाचित्र.

कोल्हापूरः ज्येष्ठ पुरोगामी नेते, विचारवंत आणि सर्वसमान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे लढवय्ये नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे आज, सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांच्या आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 वातारणात बदल झाल्यामुळे  एन.डी. पाटील यांना थोडे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागील दोन-चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणीही गेले नव्हते. ते उपचाराला फारसा प्रतिसादही देत नव्हते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कमगार, शेतकरी आणि श्रमिकांच्या अनेक प्रश्नांवर ते कायम लढत राहिले.

एन.डी. उर्फ नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यंनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. आणि एल.एल.बी. चे शिक्षण घेतले होते. त्यांनी १९५४ ते १९५७ या काळात साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. १९६० मध्ये ते इस्लामपूरच्या भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य झाले होते. १९९० पासून ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते.

 एन.डी. पाटील यांनी १९४८ मध्ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. १९६९ ते ७८ आणि १९८५ ते २०१० या काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस होते. १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणूनही काम पाहिले. १९८५ ते १९९० या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

९० च्या दशकात स्थापन झालेल्या लोकशाही आघाडीतही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. १९९९ ते २००२ या काळात ते लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक होते. महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र- कर्नाटक सीमा चळवळीचे ते प्रमुख नेते होते.

एन.डी. पाटील यांना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने १९९९ मध्ये त्यांना डी.लिट. प्रदान केली होती. २००० मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. देऊन गौरवले होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानेही त्यांना ही पदवी देऊन सन्मानित केले होते.

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण ही त्यांची पुस्तिका प्रचंड गाजली होती. त्यांनी शेतकरी व श्रमिकांच्या प्रश्नांवर विपुल लेखन केले. महाराष्ट्रभर व्याख्यानेही दिली होती. २००१ मध्ये परभणी येथे झालेल्या नवव्या विचारवेध साहित्य संमेलनात त्यांनी नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर दिलेले अध्यक्षीय भाषणही गाजले होते. ते पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा