ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचे निधन, परिवर्तनवादी चळवळीतील झुंजार नेतृत्व हरपले

0
18

लातूरः परिवर्तनवादी चळवळीतील नेते, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. ते ७१ वर्षांचे होते. प्राचार्य मोरे यांच्या निधनामुळे शोषितांच्या प्रश्नांवर आयुष्यभर लढा देणारे झुंजार नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

 प्राचार्य डॉ. मोरे हे एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी संघटनांच्या महाराष्ट्रातील संस्थापकांपैकी एक आहे. त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर अशा विवध शोषित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर काम केले.

प्राचार्य मोरे यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील गांजूर येथे १४ एप्रिल १९४९ रोजी झाला होता. विद्यार्थीदशेपासूनच ते परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय होते. स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांसाठी परिवर्तन व प्रबोधनात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.

१९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. अध्ययन, अध्यापन, संशोधन, संघटन आणि आंदोलन ही त्यांच्या जीवनाची पंचसूत्री होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या प्रश्नांवर अनेक लढे उभारले. मोर्चे काढले आणि आंदोलने केली. सामाजिक अन्याय आणि अत्याचाराविरोधी लढ्यातही ते अग्रभागी होते.

 मुक्टा, एम फुक्टो, एआय फुक्टो या प्राध्यापक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नावरही आंदोलनाचे नेतृत्व केले. गरिब विद्यार्थ्यांच्या अडचणीला आयुष्यभर धावून जाणारे प्राचार्य अशी त्यांची ख्याती होती. प्राचार्य मोरे यांच्या निधनामुळे परिवर्तनवादी चळवळीवर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा