अनाथांची माय गेलीः ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

0
174
संग्रहित छायाचित्र.

पुणेः ‘अनाथांची माय’  असा लौकिक मिळवलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज, मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना महिनाभरापूर्वी पुण्यातील गॅलेक्सी या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७४ वर्षांच्या होत्या.

गॅलेक्सी रूग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ह्रदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. २५ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती.

सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या आगोदर त्यांचे पार्थिव हडपसर येथील त्यांच्या संस्थेत नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना बोलून दाखवत हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.

सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलांसाठी आपले आयुष्य झोकून दिले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून केंद्र सरकारच्या वतीने त्यांना २०२१ मध्ये पद्मश्री देऊन गौरवण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला.  

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते हे त्यांना त्यांचे सासर आणि माहेरच्यांनीही हाकलून दिल्यानंतर स्वानुभवातून कळले होते. ते जगणे या अनाथ मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी अनाथ मुलामुलींचा सांभाळ करण्याचे शिवधनुष्य उचलले होते. महिलांवरील अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्याचे कामही त्यांनी केले. त्यांना आजपर्यंत १७२ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कारः ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या, बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेने हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्याने समाजसेवेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा