हॉटेल्स, रेस्टॉरंट्सनी ग्राहकांकडून जबरदस्तीने सेवा शुल्क वसूल केल्यास होणार कडक कारवाई

0
158
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः हॉटेल, रेस्टॉरंट चालक ग्राहकांकडून जबरदस्तीने सर्विस चार्ज म्हणजेच सेवा शुल्क आकारू शकत नाहीत. सेवा शुल्क देणे ग्राहकांना बंधनकारक नाही. जर जबरदस्तीने सेवा शुल्क घेतले गेले तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये जेवणासाठी गेल्यानंतर सर्वच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालक ग्राहकांकडून सरसकट सेवा शुल्क वसूल करतात. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडून जबरदस्तीने सेवा शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी ग्राहक हेल्पलाइनवर वाढल्या आहेत. या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा इशारा दिला आहे.

सेवा शुल्क वसुलीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने येत्या २ जून रोजी बैठक बोलावली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने (डीओसीए) आयोजित केलेल्या या बैठकीत नॅशनल रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. खाद्य पदार्थांच्या किंमती निश्चित करतानाच सर्व खर्चाचा विचार केला जातो. असे असताना वेगळे सेवा शुल्क का आकारले जाते?, अशी असंख्य ग्राहकांची मुख्य तक्रार आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

२०१७ मध्येच केंद्र सरकारने हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालकांसाठी नियमावली जारी केली होती. या नियमावलीत सेवा शुल्क बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. सेवा शुल्क द्यावे की नाही, हे ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल, असे या नियमावलीत म्हटले आहे. असे असतानाही रेस्टॉरंट्स आणि हॉटेलचालक सेवा शुल्क लावून बिल वाढवून देत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

सेवा शुल्काच्या कायदेशीरपणाबद्दल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालकांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. बिलाच्या रकमेतून सेवा शुल्क काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचालकांकडून त्रास दिला जात आहे, असे अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार गंभीर झाले आहे. सेवा शुल्क देण्यास विरोध करणाऱ्या ग्राहकांना त्रास दिल्यास अशा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचालकांवर कारवाई करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंग यांनी नॅशनल रेस्टॉरंट्स असोसिएशन ऑफ इंडियाला पत्र लिहून ग्राहकांवर सेवा शुल्क लादले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून २ जूनच्या बैठकीत याच मुद्यावर चर्चा केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा