औरंगाबादः सहायक प्राध्यापक (जुने नामाभिधान अधिव्याख्याता) होण्यासाठी आवश्यक असलेली पुणे विद्यापीठाकडून घेतली जाणारी सेट परीक्षा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराने इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातून प्राध्यापकाची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्राध्यापक गेल्या १६ वर्षांपासून औरंगाबादेत बिनदिक्कतपणे नोकरी करत असून वेतनासह विविध लाभही घेत आहे.
औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.
चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?
२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापक पद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.
विशेष बाब म्हणजे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले.
प्रा. नागनाथ तोटावाड यांची नेमकी जात कोणती?: प्रा. नागनाथ तोटावाड यांनी पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेसाठी अर्ज भरताना ते अनुसूचित जमाती प्रवर्गाचे असल्याची माहिती भरली आणि ते याच प्रवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागेवर नोकरी मिळवली. त्यामुळे प्रा. तोटावाड यांची नेमकी जात आणि प्रवर्ग कोणता? असा प्रश्न निर्माण झाला असून ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांची नियुक्ती करताना निवड समितीने त्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली नाही का? त्यांच्या नियुक्तीला मान्यता देणाऱ्या विद्यापीठानेही ते सेट कोणत्या प्रवर्गातून उत्तीर्ण झाले आणि नोकरी कोणत्या प्रवर्गातून मिळवत आहेत याची तपासणी केली नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.


४२०चा गुन्हा दाखल कराः प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी सेट परीक्षेचा फॉर्म भरताना अनुसूचित जमातीचा (एसटी) असल्याचे खोटे दस्तावेज सादर करून परीक्षा दिली आणि ते ही परीक्षा उत्तीर्णही झाले. परंतु ते कुलेकडगी या जातीचे असून इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आहेत. त्यांनी खोटी माहिती भरून शासनाची व पुणे विद्यापीठाची दिशाभूल करून सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यांच्यावर भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचे सेट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी रिपाइंच्या युवक आघाडीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे केली आहे.
प्रा. नागनाथ तोटावाड यांची ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अधिव्याख्यात्याच्या जागेसाठी निवड केलेल्या समितीमध्ये मराठा शिक्षण संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे, प्रा. आय.डी. आल्टे, प्राचार्य आर. टी. देशमुख, डॉ. आर. बी. कान्हेरे. डी. पी. सूर्यवंशी, डॉ. व्ही. एस. प्रधान आणि डॉ. डी.एस. पोकळे यांचा समावेश होता. त्यांनीही या नियुक्तीत विद्यापीठाची फसवणूक केली असून या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना विद्यापीठाने दिलेली मान्यता तत्काळ रद्द करावी आणि त्यांनी फसवणूक करून आतापर्यंत घेतलेल्या वेतनाची वसुली करावी, अशी मागणीही गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रकुलगुरूंकडे केली आहे.