अमित शाहांची पाठ फिरताच राणेंच्या गडात भाजपला खिंडार, ७ नगरसेवकांचे राजीनामे

0
1247
संग्रहित छायाचित्र.

सिंधुदुर्गः केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून दिल्लीला माघारी फिरत नाहीत तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला शिवसेनेने खिंडार पाडले असून वैभववाडी नगरपंचायतीच्या सात नगरसेवकांनी तडकाफडकी भाजपला जय श्रीराम ठोकला आहे. हे सात जण आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता होती. आता या नगरपंचायतीची लवकरच निवडणूक होणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाचवेळी पक्षाचा राजीनामा दिला आहे. वाभवे-वैभवाडी नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, संपदा राणे, दीपा गजोबार हे चार माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक संतोष पवार, रविंद्र तांबे, स्वप्निल इस्वलकर या सात नगरसेवकांनी भाजपला जय श्रीराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत भाजपचे वैभववाडी बुथप्रमुख संतोष निकम, शिवाजी राणे आणि दीपक गजोबार यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजप नेते नारायण राणे यांनी कसाल पडवे येथे उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी राणेंच्या खास आग्रहास्तव केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शाह हे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. शाह यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली होती. शाह यांच्या भाषणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारल्याचे मानले जात असतानाच भाजपच्या या सात नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

वैभववाडी नगरपंचायत नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात आहे. या नगरपंचायतीत १७ पैकी १७ नगरसेवक भाजपचेच होते. यातील सात नगरसेवकांनी शाह यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी पक्षाला जय श्रीराम ठोकला. या नगरपंचायतीची आता लवकरच निवडणूक होणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला खिंडार पडल्यामुळे सगळीच राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

भाजपला सोडचिठ्ठी दिलेले हे सात नगरसेवक आणि अन्य काही भाजप पदाधिकारी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे तर आमच्या पक्षाच्या सात नगरसेवकांनी राजीनामे दिल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही, असे भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा