महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, वाहून जाणारे पाणी थांबवूः ठाकरे

0
74

मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे,  वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कै.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत, पाणी पुरवठा व स्वच्छता  मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून गोडे पाणी उपलब्ध करणे, तसेच मराठवाडा व विदर्भातील परिसरासाठी पाणी वळवण्याचा पर्याय उपयोगात आणावा लागेल. भावी पिढ्यांसाठी आपल्याला पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. राज्यातील वाया जाणारे पाणी, समुद्राच्या पाण्याचा उपयोग अशा अनेक गोष्टींवर विचार करावा लागेल. इस्त्रायलसारख्या देशात खारे पाणी गोडे करून वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडेही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. नवीन धरणापेक्षा आहे त्या संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उत्कृष्ट नियोजनाची दूरदृष्टी असलेले दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण हे आधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आपण जलसंपदा विभागामार्फत हे पुरस्कार देत आहोत. जलसाक्षरता आणि पाण्याचे नियोजन यासाठी जलभूषण पुरस्कार विजेत्यांनी केलेले काम पुढे अनेकांपर्यंत पोहोचावे, त्यातून जलसाक्षरता निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या शिस्तीचा चांगला परिणाम आज आपण अनुभवतो आहोत. कितीही मोठे शोध लागले, विकास झाला, तरी पाणी निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित होऊ शकलेले नाही. जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचे नियोजन करावेच लागेल. शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. एकीकडे पाणी कधी मरणोन्मुख माणसाला वाचवते. पण पूर आला, तर तेच पाणी बुडवून टाकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे महत्वाचे आहे. हेच नियोजन दिवंगत शंकररावजी यांनी त्या काळी दूरदृष्टीकोनातून केले. त्यांनी जायकवाडी धरणाच्या माध्यमातून एक दिशा दिली. त्यासाठी पाऊलही टाकले, असे ठाकरे म्हणाले.

ध्येय्य वेड्या जलमित्रांचा सन्मान-पवारः राज्याच्या जलक्रांतीचे जनक दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जलक्रांतीचे कार्य पुढे नेणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. निश्चितच ध्येयवेड्या जलमित्रांचा, जलक्रांतीसाठी झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. जलक्रांतीची ही चळवळ झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचवून यास लोकचळवळीचे स्वरुप येवो, अशा अपेक्षा व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी जलसाक्षर होऊया, असे आवाहन केले.

या निमित्त दिवंगत शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करताना त्यांच्या काळात झालेल्या विविध निर्णयांची माहिती देत डॉ.शंकरराव चव्हाण यांची ओळख त्यांच्या ज्ञानातून झाली. साधेपणा, प्रशासनावर पकड, हेडमास्तर अशी ओळख असलेल्या दिवंगत शंकररावजी चव्हाण यांची कारकीर्द संस्मरणीय राहिली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

पुरस्कार्थींचे कार्य अनुकरणीय-चव्हाणः दिवंगत डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या नावाने दिला जाणारा हा जलभूषण पुरस्कार आहे. हा पुरस्कार जलसंपदा विभागामार्फत देण्यात येत आहे त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विभागाचे आभार मानले. 12 वर्ष जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून दिवंगत डॉ.शंकरराव यांनी काम केले. पाण्याचे महत्व त्यांनी ओळखले. त्यांनी त्यावेळी उभारलेल्या उत्तम प्रकल्पाची फळे आज आपल्याला मिळत आहे. महाराष्ट्राची तहान भागविण्याचे काम झाले, हे सर्व करताना यात सर्वांचे संयुक्त योगदान राहिले. असेही चव्हाण म्हणाले.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करुन त्यांनी म्हटले की, जलसंपदा  क्षेत्रात भरीव असे काम या मंडळींनी केलेले आहे. त्यांचे कार्य हे निश्चितच अनुकरणीय आहे. जलजागृती, गाळयुक्त शेती, जलक्रांती या क्षेत्रातील केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार आहे. जलसंपदा विभाग देखील चांगले कार्य करीत आहे. राज्याची जलसंपदा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध आहे. पुढील वर्षापासून जलसंपदा विभागात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील पुरस्कार देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. 

महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार-पाटीलः प्रास्ताविकात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिवंगत शंकररावजी चव्हाण यांना अभिवादन केले. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये दिवंगत डॉ.शंकररावजी चव्हाण यांचे मोठे योगदान असून त्यांचा कालखंड पाच दशकांचा आहे. जायकवाडी धरण निर्मितीसारखे मुलभूत निर्णय घेण्यात त्यांचा पुढाकार होता. त्याचीच फळे आज महाराष्ट्र चाखत आहे. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम वाखाणण्यासारखे आहे. मोठी जलसंपन्नता त्यांनी निर्माण केली, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जलसंपदा विभागाबाबत पाटील म्हणाले, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे काम जलसंपदा विभाग करत आहे. विभागाने ३ हजार २७७ प्रकल्प पूर्ण केले आहेत. सिंचन क्षेत्र ५४ लाख २४ हेक्टर इतके आहे. याच्या सुरुवातीचे श्रेय दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या विधायक व दूरदृष्टीकोनाला जाते. कागदावरील प्रकल्प आता प्रत्यक्षात आणण्याचे आमचे काम सुरु आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौतुक करावे, प्रोत्साहन द्यावे यासाठी हा पुरस्कार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जलभूषण पुरस्कार-२०२०चे विजेतेः मान्यवरांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार-२०२० चे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार विजेते कै. सुनिल पोटे (नाशिक), द्वितीय पुरस्कार अनिकेत लोहिया (अंबाजोगाई), तर तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन (नागपूर) यांना मिळाला आहे. अनुक्रमे रुपये पाच लाख, तीन लाख व दोन लाख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै.सुनिल पोटे यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी मनीषा पोटे यांनी स्विकारला. पोटे यांनी पुरस्कार्थींच्या वतीने यावेळी मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा