मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांचे ५ नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार

0
53
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन आजच्या भारत बंदमुळे अधिक व्यापक झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे कायदे मागे घ्यावेत म्हणून मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह देशातील पाच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उद्या, बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या १३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. आजच्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रासह उत्तर भारताने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच व्यापक बनले असताना पाच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उद्या, बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.

कोरोना प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींनी फक्त पाचच जणांना भेटीची परवानगी दिली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे प्रतिनिधी असतील, अशी माहिती माकप नेते सीताराम येचुरी यांनी दिली. उद्या सायंकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे. हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्याची मागणी करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा