सत्ता परत येणार नसल्याने भाजपचे नैराश्य वाढले, पण फडणवीसांनी जरूर आशा बाळगावीः शरद पवार

0
92
संग्रहित छायाचित्र.

मुंबई राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार सर्व संकटांचा योग्‍य प्रकारे सामना करत समाजातील अगदी शेवटच्या घटकालाही सोबत घेउन काम करत आहे. यामुळे आता आपल्‍याला काही सत्‍ता परत मिळणार नाही हे पाहून त्‍यांचे नैराश्य वाढले आहे. विरोधी पक्षावरील नेत्‍यांच्या कारवाईतून भाजपची ही अस्‍वस्‍थता व्यक्‍त होत असल्‍याची टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सत्‍ता परत येण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्यावर माणसाने केवळ आशा बाळगण्यास काहीच हरकत नसते असा टोलाही त्‍यांनी लगावला.

माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठठी देत आज राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांनी त्‍यांना पक्षात अधिकृत प्रवेश दिला. त्‍यावेळी बोलताना पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्‍त्र सोडले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाईबाबत विचारले असता ते म्‍हणाले, महाराष्‍ट्रात आता वर्षभरानंतर महाविकास आघाडी सरकार चांगले स्‍थिरावले आहे. कोरोनाचे संकट आले इतरही संकटे आली. पण या संकटांना मात देत समाजातील अगदी शेवटच्या घटकासोबत उभे राहत सरकारने प्रत्‍येक संकटावर मात केली. हे पाहून भाजपला आता नैराश्य आले आहे. आपले सरकार काही आता येत नाही हे उमगल्‍याने अस्‍वस्‍थतेपोटी ते अशी पावले उचलत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मंत्री अनिल देशमुख,धनंजय मुंडे,नवाब मलिक आदी नेते यावेळी उपस्‍थित होते.

जयसिंगराव गायकवाड हे माणसांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत. देशातील ते कदाचित एकमेव खासदार असतील की ते दौ-याच्या वेळी स्‍थानिक जनतेच्या घरीच मुक्‍काम करायचे. मतदारसंघातील गावा-गावात त्‍यांचा संपर्क आहे. दिवस-रात्र ते माणसांची सुख-दुःख समजून घेणयाचेच काम करत राहिले. त्‍यांच्या येण्याने पक्षाला निश्चितच फायदा होईल, असेही शरद पवार म्‍हणाले.

दानवे ज्योतिषी आहेत, हे आज कळलेः सरकार परत येण्याच्या रावसाहेब दानवे यांच्या वक्‍तव्यावर ते म्‍हणाले, दानवे इतकी वर्षे लोकप्रतिनिधी आहेत पण ज्‍योतिष सांगण्याचाही त्‍यांचा हा गुण आपल्‍या परिचयाचा नव्हता. फडणवीस गेल्‍या वेळी मी परत येईन,मी परत येईन असे म्‍हणत होते. कालपरवा पण त्‍यांनी अशाच पदधतीचे काही तरी वक्‍तव्य केले.माणसाला आशा लागून राहिलेली असते.त्‍यांनी आता केवळ आशा बाळगण्यात काहीच हरकत नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

खतरनाक दहशतवाद्याने भाजपचा ताबा घेतल्यासारखी स्थितीः गायकवाड यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्‍या भावना व्यक्‍त केल्‍या. ते म्‍हणाले,१२ वर्षे राष्‍ट्रवादीला सोडल्‍याचा आपल्‍याला पश्चाताप झाला.त्‍याचे पापक्षालन करण्यासाठीच पुन्हा तुमच्यासोबत आलोय. आता मी आलोय. आपल्‍यामागे राष्‍ट्रवादीत येणाऱ्यांची मोठी लाईन आहे.भाजपामध्ये चांगल्‍या कार्यक‍त्‍याला मान नाही,सन्मान नाही. चांगल्‍या कार्यकर्त्‍याचे वाळवंट करण्याचा प्रकार तिथे सुरू आहे. एखादया खतरनाक दहशतवाद्याने पक्षाचा ताबा घेतल्‍यासारखी तिथे अवस्‍था आहे. जिथे आपला कोंडमारा होतो अशा पक्षात राहायचे नाही हा निर्णय घेतला, असे गायकवाड म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा