भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधून शिरोमणी अकाली दलही बाहेर!

0
36

चंदीगडः मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन नवीन कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकरी संताप व्यक्त करत असतानाच भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्येही फूट पडली आहे. या कृषी विधेयकांच्या मुद्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या शिरोमणी अकाली दलाने आता भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधून बाहेर पडत असल्याची अधिकृत घोषणा आज केली. एनडीएमधून बाहेर पडणारा अकाली दल हा शिवसेनेनंतर दुसरा सर्वात जुना पक्ष ठरला आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ही तीन कृषी विधेयके मंजूर करण्यापूर्वी शिरोमणी अकाली दल मोदी सरकारचा घटक पक्ष होते. मात्र या विधेयकांना विरोध करत  गेल्याच आठवड्यात बादल यांच्या पत्नी हरसिरमत कौर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडल्या आहेत.

शेतमालाला हमीभावाची (एमएसपी) स्वायत्त कायदेशीर हमी देण्यास मोदी सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे पंजाबी आणि शिखांच्या मुद्यावर कायमच असंवेदनशील राहिले आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमधून बाहेर पडण्याचा एकमुखी ठराव शिरोमणी अकाली दलाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी बैठकीनंतर ही घोषणा केली.

शिरोमणी अकाली दल हा एनडीएचा सर्वात जुना घटक पक्ष असून तो आज एनडीएतून बाहेर पडला आहे. या आधी शिवसेना आणि तेलगू देशम एनडीएमधून बाहेर पडली आहे. मात्र तेलगू देशमचे एनडीएमध्ये येणे-जाणे सुरूच होते. मोदी सरकारने आणलेली तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांसाठी घातक आणि विनाशकारी असल्याचे बादल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा