अजित पवारांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत पवारांच्या भेटीला

0
64

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे चर्चेला उधाण आलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांच्या भेटीला गेले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारही सिल्व्हर ओकवरच आहेत.

तत्पूर्वी सकाळी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेवून चर्चा केली. या भेटीनंतर शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले आणि चिंता करू नका. अजितदादा स्पष्ट बोलणारे नेते आहेत. ते काहीही हातचे राखून ठेवत नाहीत, असे सांगतानाच अजितदादाच भूमिका मांडतील, असे पवारांनी सांगितले होते. आम्ही केवळ राजकारणावरच नाही तर मुलांच्या बाळांच्या लग्नावरही चर्चा केल्याचे पवारांनी सांगितले होते. त्यानंतर दुपारी साडेवाजेच्या सुमारास अजितदादा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे सांगितले गेले. नेमकी हीच संधी साधून संजय राऊत हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवीनच चर्चेला तोंड फुटले आहे. शरद पवारांच्या कौटुंबिक कलहात मला अजिबात रस नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळीच शिवसेनेच्या मेळाव्यात सांगितले होते, तरीही उद्धव ठाकरेंचा नेमका कोणता निरोप घेऊन राऊत सिल्व्हर ओकवर पोहोचले, अशी चर्चा रंगली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा