भाजप- शिवसेना महायुतीची गाजावाजा न करताच घोषणा, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही गुलदस्त्यातच

0
175

मुंबई : शिवसेना- भाजप आणि मित्रपक्षांच्या बहुप्रतिक्षित महायुतीची घोषणा फारसा गाजावाजा न करताच सोमवारी सायंकाळी संयुक्त पत्रकाव्दारे करण्यात आली आहे. मात्र या पत्रकात शिवसेना, भाजप आणि मित्रपक्ष नेमक्या किती जागा लढवणार याचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई या दोघांच्याच स्वाक्षर्‍या आहेत. रिपाइंसह अन्य मित्रपक्षांच्या नेत्यांना या संयुक्त पत्रकावर अजिबात स्थान देण्यात आलेले नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाइं नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे नेते  विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने  घेण्यात आला. त्यानुसार आम्ही महायुतीची घोषणा करत आहोत, असे या संयुक्त पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  महायुतीत कोणता पक्ष कोणती वा किती जागा लढवणार याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल. ही महायुती राज्यातील जनतेचा अभूतपूर्व आशीर्वाद प्राप्त करेल, असा विश्‍वासही या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे. या संयुक्त पत्रकात या त्रोटक तपशीलासह अन्य कुठलाही तपशील देण्यात आला नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांच्या हातात केवळ चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे जागा वाटपावरून शिवसेना- भाजपमधील मतभेद अद्यापही संपुष्टात आलेले नाहीत, असा अर्थ यातून काढला जाऊ लागला आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनीही यावेळच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी केली आहे. त्यांना झुलवत ठेवण्यासाठीच जागावाटप गुलदस्त्यात ठेवले गेले असण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. तत्पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे महायुतीची घोषणा संयुक्तपणे करतील अशी माहिती दिली होती. तसे न होता शेवटी पाटील यांच्याच स्वाक्षरीचे संयुक्त पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळेही अनेक तर्क लढवले जात आहेत.

 आदित्य ठाकरे वरळीतून मैैदानात, राष्ट्रवादी काँग्रेस देणार उमेदवार

 दरम्यान, ठाकरे घराण्याची परंपरा मोडित काढत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि आदित्य ठाकरेंना बिनविरोध निवडून देण्याची विनंती केल्याचे सांगितले जाते. मात्र वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तेव्हा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा