सत्तारांच्या गद्दारीमुळे शिवसेनेचे उपाध्यक्षपद हुकले, सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाहीः खैरे

0
478
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः महाविकास आघाडी सरकारच्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे गद्दार असून त्यांना शिवसेनेतून हाकला. त्यांना यापुढे मातोश्रीची पायरी चढू देणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी चढवला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेचे निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला अब्दुल सत्तार यांच्यामुळे मोठा फटका बसून जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भाजपकडे गेल्यामुळे शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते पडल्याने चिठ्ठी उडवली गेली. त्यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके विजयी झाल्या. उपाध्यक्षपदासाठीही अशीच स्थिती अपेक्षित  होती मात्र महाविकास आघाडीची दोन मते फुटल्यामुळे भाजपचे एल.जी. गायकवाड विजयी झाले. सत्ताधारी शिवसेनेच्या हातून उपाध्यक्षपद देल्यामुळे चंद्रकांत खैरे चांगलेच संतप्त झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळेच उपाध्यक्षपदी भाजपचा विजय झाला, असा आरोप खैरे यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदावर रहाण्याचा काहीएक अधिकार नाही, असेही खैरे म्हणाले.

अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतल्याने शिवसेनेचा नेता म्हणून मी त्यांना समजावण्यासाठी गेलो असता ते आमच्या शिवसेनेबद्दल वेडेवाकडे बोलले. तुमच्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेत आहेच काय? मी राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला आहे, असे सत्तार म्हणाले. असे बोलणार्‍या माणसाला शिवसेनेत राहण्याचा अधिकार नाही. आम्ही वर्षानुवर्षे परिश्रम घेऊन येथे संघटना वाढवली असताना आम्हाला शिकवणारा हा टिकोजीराव कोण? अब्दुल सत्तारांसारखे गद्दार पक्षात घेऊन काय फायदा? , असे सवालही खैरे यांनी केले आहेत. पक्षप्रमुखांनी अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा वगैरे करण्याची अजिबात गरज नाही, असे मी शिवसेना पक्षप्रमुखांना सांगणार आहे. अब्दुल सत्तारांना मातोश्रीची पायरी चढण्याचाही अधिकार नसल्याचे खैरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा