‘स्क्रिप्ट भाजपची, भोंगा भाजपचा आणि टाळ्याही स्पॉन्सर… कालची सभा राज ठाकरेंची नव्हतीच!’

0
363
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज ठाकरेंची कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलेली होती. सभेला भोंगाही भाजपचा होता. त्यांना मिळणाऱ्या टाळ्या देखील स्पॉन्सर होत्या. काल शिवतीर्थावर भाजपचा लॉऊडस्पिकर वाजत होता. कालची सभा राज ठाकरेंची नाही, तर भाजपची सभा झाली. अक्कलदाढ एवढी उशिरा कशी काय येते?, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शीवतीर्थावरील पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा समाचार घेतला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले होते. विशेष म्हणजे या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपविरोधात चकार शब्दही काढला नाही. उलट उत्तर प्रदेशातील लोकांनी विकासाला मते दिल्याचे सांगत त्यांनी स्तुतीसुमनेच उधळली. राज ठाकरे यांच्या भाषणातील हीच बाब राजकीय विश्लेषकांना खटकली होती. नेमके त्यावरच आज संजय राऊत यांनी भाष्य केले.

भाजप आपली मळमळ राज ठाकरे यांच्या भोंग्यातून उतरवत आहे. काल शिवतीर्थावर राज ठाकरेंची नाही तर भाजपची सभा झाली. कालची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती. सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढेच नाही तर कालच्या सभेत मिळालेल्या टाळ्याही स्पॉन्सर होत्या. अक्कलदाढ येते हे माहीत होते, पण एवढ्या उशिरा…?  अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पवारांच्या चरणाजवळ तुम्हीही जात होतातः महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवारांमुळे सुरूवात झाल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनी जातीयवाद पसरवला असे म्हणता… पण सल्लामसलत करण्यासाठी त्यांच्या चरणाशी तुम्हीही जात होतात. कशाला उगीचच आपण टोलेजंग माणसावर बोलायचे?  तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, पण त्या देखील प्रायोजित आहेत, असे राऊत म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

काल त्यांनी मराठी भाषा भवनाचे स्वागत करायला हवे होते. महाराष्ट्राच्या राजधानीत इतके मोठे कार्य घडले आहे. त्याच्याविषयी काही बोलले नाहीत. फक्त टीका केल्याने काय मिळते?  आहे ते देखील गमावून बसाल, तुमच्या भोंग्याचे, यांच्या भोंग्याचे काय करायचे, हे ठरवण्यासाठी सरकार समर्थ आहे, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा