विधान परिषद उपसभापतिपदी पुन्हा डॉ. नीलम गोऱ्हेंचीच वर्णी लागणार, भाजपचे गिरकरही रिंगणात

0
114
संग्रहित छायाचित्र.

मुंबई विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीकडून मावळत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाने भाई गिरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

जून महिन्यांमध्ये उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या सदस्यत्वाची मुदत संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. जुलै महिन्यात  विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक होऊन निलम गोऱ्हे या पुन्हा सदस्य झाल्या. पण अधिवेशन नसल्याने उपसभापतीपद रिक्त होते. या अधिवेशनात सरकारकडून ही निवडणूक घेतली जाणार याची कुणकुण लागल्यावर भाजपने या निवडणुकीला विरोध केला होता.

विधानपरिषदेतील १८ जागा सध्या रिक्त आहेत. तसेच कोरोनामुळे काही सदस्य या अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यामुळे या अधिवेशनात निवडणूक घेऊ नये असा आग्रह भाजपाने धरला होता. मात्र सरकारने विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी उपसभापतिपदाचा निर्णय होईल. उपसभापतिपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले आहे. तर  भाजपकडून भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एकट्या भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य़ः मंगळवारी सभागृहात आघाडीच्यावतीने सूचक आणि अनुमोदकांकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. विरोधी पक्षाने मतविभाजनाची मागणी केल्यास प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधातील मते मोजली जातील. विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ असून यातील १८ जागा रिक्त आहेत. भाजपचे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना १४, राष्ट्रवादी ९, काँग्रेस ८, लोकभारती एक असे संख्याबळ असून ३२ सदस्य आहेत. त्यामुळे आघाडीचे पारडे जड असून विधानपरिषद उपसभापतीपदी डॉ. गोऱ्हे यांचीच पुन्हा निवड होण्याची जास्त शक्यता आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा