शिवरायांच्या वंशजांनो बोला…. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ वादावर उदयन, संभाजीराजेंना आव्हान

2
383
छायाचित्रः जयभगवान गोयल यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

मुंबईः ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपने प्रकाशित केलेल्या पुस्तकावरून वाद पेटत चालला आहे. देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून छत्रपती शिवरायांच्या अपमान केल्याबद्दल भाजपने माफी मागावी, अशी मागणी होत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवरायांच्या वंशजांनाच या वादात आव्हान दिले आहे. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला… काही तरी बोला… असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. विशेष म्हणजे शिवरायांचे हे तिन्ही वंशज ज्या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना केली त्याच भाजपमध्ये आहेत. दिल्ली भाजपच्या कार्यालयात आयोजित धार्मिक- सांस्कृतिक संमेलनात ज्येष्ठ भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या हस्ते ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’  या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. अशी तुलना करणे हा छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राचाही अपमान आहे, अशी टीका सर्वस्तरातून केली जात आहे.

हेही वाचा: मोदींची थेट शिवरायांशी तुलना: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून देशभर संतापाची लाट!

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहेत. त्यातील एका ट्विटमध्ये थेट शिवरायांच्या वंशजांनाच बोलते होण्याचे आव्हान देण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे महान पुस्तक लिहून भाजप कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप!! असे राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ स्तभंलेखक आणि पत्रकार राजू परूळेकर यांनीही या पुस्तकावरून भाजपचा समाचार घेतला आहे. ‘मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज तर सोडाच पण एखाद्या मावळ्या इतकेसुद्धा पराक्रमी नाहीत. रयतेची महाराजांनी जी काळजी घेतली ती आत्ममग्न मोदींच्या गावीही नाही. मीदींना महाराजांची उपमा देऊन भाजपने रयतेच्या राजाचा- महाराजांचा नि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी परूळेकर यांनी केली आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा