आ देखे जरा किसमें कितना है दम…. ईडीच्या नोटिशीविरुद्ध संजय राऊतांनी थोपटले दंड!

0
207
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालयानालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. या नोटिशीवर संजय राऊत यांनी ‘आ देखे जरा किसमें कितना है दम…’ असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे संजय राऊत ईडीच्या या कारवाईवर आक्रमक भूमिकेत दिसणार याचे स्पष्ट संकेतच राऊतांनी दिले आहेत.

भोसरी भूखंड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात चौकशी करत असलेल्या ईडीला वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही प्रकारचे व्यवहार आढळून आल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांना मंगळवार, २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आता या नोटिशीवर संजय राऊत यांची आक्रमक प्रतिक्रिया आली आहे.

हेही वाचाः शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस

आ देखे जरा किसमें कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी ईडीच्या या कारवाईवर आक्रमक भूमिकेत दिसण्याचे संकेत देतानाच पत्नी वर्षा राऊत यांनाही न डगमगता ठाम राहण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे आता भाजपविरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

 याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपच्या विरोधात जाणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो, असे राऊत म्हणाले होते. आता राऊतांच्या पत्नीलाच ईडीने नोटीस बजावल्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा