पाच वर्षांत औरंगाबादचे नामांतर होणार का?, माहीत नाहीः शिवसेना नेते सुभाष देसाईंचे उत्तर

0
99
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावर आम्हाला राजकारण करायचे नाही. दिवंग बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा दिलेला आदेश आमच्यासाठी पूर्व दिशा आहे. पाच वर्षाच्या कालावधीत औरंगाबादचे नामांतर होणार का, माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला असून याच मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. टीव्ही९ शी बोलताना देसाई यांनी भाजपचे चांगलेच वाभाडे काढले.

गेली पाच वर्षे सत्ता कुणाकडे होती? सर्व सत्ताधीश कोण होते? मात्र त्यावेळी औरंगाबादचे नामांतर त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नव्हता. आता त्या मुद्यावरून राजकारण करून फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेला ही सर्व परिस्थिती माहीत आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांना औरंगाबादच्या नामांतराविषयी एवढीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का? असा सवालही देसाई यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला आहे.

गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही. कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त करणारच, असे देसाई यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा