‘वन’वास संपणारः संजय राठोड यांची लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी?, शिवसेना मंत्र्यांचे संकेत

0
540
संग्रहित छायाचित्र.

यवतमाळः पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात वाढत्या राजकीय दबावामुळे वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता बळावली आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्यूप्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये चांगलेच तापले होते. पुण्यातील वानवाडी भागात इमारतीवरून उडी घेऊन पूजा चव्हाणने ८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्या होत्या. त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागले होते. वाढत्या राजकीय दबावामुळे अखेर संजय राठोड यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने यवतमाळ जिल्हा प्रशासनाला आठ व्हेंटिलेटर सोपवून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे यवतमाळ/ वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या पुन्हा मंत्रिमंडळ समावेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

 संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्याच लोकांची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

कोण आहेत संजय राठोड?

संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून झालेले विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री होते. राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे.

संजय राठोड यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच शिवशक्ती संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते शिवसेनेत आले. वयाच्या २७ व्या वर्षी ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झआले. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.

शिवसेना जिल्हाप्रमुख असताना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्जा विमानतळाला ‘संत गाडगेबाबा विमानतळ’ असे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाने संजय राठोड यांनी राज्यातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

या आंदोलनानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनाही त्यांनी थेट आव्हान दिले. अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. २००४ मध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते.

२००९ मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दारव्हा मतदारसंघ रद्द झाला आणि दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. राठोड हे २०१४ मध्ये तिसऱ्यांदा निवडून आले.

२०१९ मध्ये संजय देशमुख यांचे तगडे आव्हान असतानाही ते तब्बल ६० हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळेच मंत्रिमंडळात संजय राठोड यांची वर्णी लागली होती. मात्र पूजा चव्हाण प्रकरण समोर आले आणि राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा