कारंजाच्या भाजप आमदाराकडून ५०० कोटींचा घोटाळा, त्यांनाही ईडी लावणार का?: खा. गवळी

0
1813
संग्रहित छायाचित्र.

वाशिमः कोणतीही पूर्वसूचना न देता ईडीने केलेली कारवाई हा जुलमीपणा असून आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहे. भाजपचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडीमार्फत चौकशी लावणार का? असा सवाल यवतमाळ- वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी केला आहे.

भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर आज ईडीने छापेमारी केली आहे. ७२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांच्या पाच संस्थांच्या नऊ ठिकाणच्या कार्यालयांची ईडीमार्फत झाडाझडती घेतली जात आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी खा. गवळी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. त्या पार्श्वभूमीवर खा. गवळी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मला ईडीने कोणतीही नोटीस दिलेली नाही. ईडीचे अधिकारी आलेले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहे. शिवसेनेच्या सर्वच मंत्री, नेत्यांना टार्गेट केले जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वतः नोंदवला आहे. मला तो हिशेब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातीलच एक वाक्य पकडायचे आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्विट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा, असा खेळ काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी मांडला आहे, असेही गवळी म्हणाल्या.

भाजपचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे.  कारंजाचे भाजप आमदारांनी केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाल्याचे मी पुरावे सादर केले आहेत. केंद्र सरकार त्यांचीही ईडीमार्फत चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. जशी माझी चौकशी सुरू आहे, तशी त्यांचीही लावा, असेही खा. गवळी म्हणाल्या.

हेही वाचाः शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ईडीचे छापे, यवतमाळ- वाशिममध्ये खळबळ

 भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीची कितीही चौकशी केली तरी त्यामध्ये काहीही आढळणार नाही. माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे, तिथे ग्रामीण भागातील मुले २० वर्षांपासून शिक्षण घेत आहेत. विद्या देण्याचे काम त्या ठिकाणाहून होत आहे. मी या भागातून पाचवेळा खासदार झाले आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नाही, असेही भावना गवळी म्हणाल्या.

 काय आहे भाजप आमदाराचा ५०० कोटींचा घोटाळा?: कारंजाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी खोटे दस्तावेज तयार करून ५०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे. वाशिम शहरातील रिसोड मार्गावर असलेले व्यावसायिक दुकानांचे गाळे अवैधरित्या बांधलेले आहेत. यामध्ये अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. या गाळ्यांमध्ये २०१४ ते २०१७ पर्यंत अधिकृत वीज कनेक्शन नसताना वीज कशी वापरल्या गेली? असा सवालही खा. भावना गवळी यांनी २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन केला होता. ज्या जागेवर निवासी बांधकामाची परवानगी मागितली, त्या जागेवर व्यावसायिक दुकानांचे बांधकाम करण्यात आल्यामुळे हे बांधकाम अवैध असल्याचाही खा. गवळी यांचा आरोप आहे.

वाशिम शहरातील सर्वे नंबर ५०२ ही पुसद नाका लगतची जमीन अकृषक करण्यासाठी एकत्रित खरेदी करण्यात आल्याचे दाखवल्या गेली. परंतु ही खरेदी वेगवेगळ्या लोकांच्या नावावर आहे. २००९-१० मध्ये जमिनीचे चुकीचे फेरफार तयार करण्यासाठी महसूल विभागाला भाग पाडण्यात आले. वाशिम येथील एका तलाठ्याला हाताशी धरून चुकीचे दोन फेरफार करायला लावले. त्यामध्ये फेरफार क्रमांक ४४१९ व फेरफार क्रमांक ४४२० या दोन्ही फेरफारचे आधार किंवा फेरफारचा व्यवहार हा वाटणीपत्र असे चुकीचे दाखवण्यात आल्याचाही खा. गवळी यांचा आरोप आहे. शहर व इतर ठिकाणी जमिनी बळकावण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करून सुमारे ५०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा करण्यात आल्याचा आरोप खा. गवळी यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा