शिवसेना यूपीएत नाही, त्यामुळे नेतृत्वाबद्दल सल्ले देऊ नयेः काँग्रेसने फटकारले

0
110
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए म्हणजेच संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी पुढे आली असतानाच शिवसेनेनेही तसाच सल्ला दिला आहे. शिवसेनेचा हा सल्ला काँग्रेसला पटलेला दिसत नाही. शिवसेना यूपीएचा भाग नाही, त्यामुळे त्यांनी नेतृत्वाबद्दल आम्हाला सल्ले देऊ नये, अशा शब्दांत काँग्रेसने शिवसेनेला फटकारले आहे.

शरद पवार जर यूपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात शरद पवारांनी जो करिश्मा केला तसाच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण त्यात तथ्य नसल्याचे स्वतः पवारांनीच स्पष्ट केले आहे. जर असा कोणता प्रस्ताव आला तर त्याचे समर्थन करू, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते.

शिवसेनेच्या या सल्ल्याला काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना हा पक्ष यूपीएमध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी यूपीएच्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात किमान समान कार्यक्रमावरून शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करू नये, असे अशोक चव्हाण यांनी सुनावले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा