मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती,ठाकरे घराण्याकडे पहिल्यांदाच नेतृत्व!

0
181
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्रात स्थापन होऊ घातलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावर तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत सहमती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ही माहिती दिली.

शिवसेनेसोबत राज्यात सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजधानी दिल्लीत झालेल्या दोन मॅरेथॉन बैठकांत सहमती झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शरद पवार,उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, मल्लिकार्जुन खारगे आदी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठक सुरू असतानाच शरद पवार काही खासगी कामानिमित्त बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही, असे सांगितले. शरद पवारांनंतर काही वेळाने उद्धव ठाकरेही बैठकीबाहेर पडले. त्यांनी कोणतेही थेट विधान केले नाही. सगळ्याच मुद्यांवर चर्चा झाली की आम्ही तुम्हाला सांगू, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपचीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर

 दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच आता आपणाला सत्तेपासून मुकावे लागणार असल्याची चिन्हे दिसल्यामुळे भाजपनेही शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केल्याचे वृत्त येऊन धडकले आहे. मात्र, आता मुख्यमंत्रिपदच काय, इंद्रपद दिले तरी माघार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपची ही ऑफर धुडकावून लावली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा