‘चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करा, त्यांच्या छातीत हिंदुत्वाबाबत काळेकुट्ट विष’

0
229
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमिया पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी करण्यात यावी. ते म्हणाले, ‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे, याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच सहकुटुंब अयोध्या दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती आणि आमची छाती फाडली तर त्यात श्रीरामच दिसतील, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे.

राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ठाकरे सरकारच्या अध्योध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा, श्रीरामाला त्रास होईल, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांना चांदमिया अशी उपमाही शिवसेने दिली आहे. चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. या विषात राम कसा नांदेल? हा साधा प्रश्न आहे. चांदमियां पाटील वगैरेंच्या छातीत राम आहे. मग इतरांना काय छात्या नाहीत? पण बहकलेला, निराश झालेला विरोधी पक्ष काय बोलतो आणि कसा वागतो ते त्यांनाच माहीत!  असेही शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा