‘चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा!!’

0
217
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वतःचेच पोट व घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडूनही गेल्या आहेत! चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा!!, अशी घणाघाती टीका शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. त्यांच्या दौऱ्यावर ‘पवारांना आत जाग आली का?’  असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टोलेबाजी करत उत्तर दिले आहे. संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झालेला असताना महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दुखणाऱ्या पोटावर डावा हात दाबत उजवी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारली आहे. ‘शरद पवारांना आता जाग आली का?’ असा उटपटांग सवाल पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे. कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही, असे सहसा घडत नाही, अशी जोरदार टीका शिवसेनेने केली आहे.

शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्यवेळ साधतात, असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत. डोळे सताड उघडे ठेवून जागेपणी महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्याची ते वाट पाहात आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे काहीकाळ त्यांनी झोपलेलेच बरे. शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वतःचेच पोट व घसा दुखवून घेऊ नये, असा सल्लाही शिवसेनेने भाजपला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा