भाजप म्हणते दोन- तीन महिन्यांत आपलेच सरकार, भ्रमातून बाहेर पडाः शिवसेनेचा इशारा

0
61
संग्रहित छायाचित्र.

मुंबई/ परभणीः हातची सत्ता जाऊन वर्ष उलटले तरी महाराष्ट्रात पुन्हा आपलेच सरकार येईल, हा ‘दुर्दम्य आशावाद’ सोडायला भाजप नेते तयार नाहीत. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीत बोलताना पुढील दोन-तीन महिन्यांत राज्यात भाजपचेच सरकार असेल, असा दावा केला आहे. तर लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले. ते टिकणारच आहे, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या दिवसापासूनच भाजप नेते राज्यातील राजकीय अस्थिरतेची चर्चा करून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यात भाजप सरकार स्थापन करणार असल्याचे दावे भाजप नेते वारंवार करत आहेत. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही काल परभणीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुढील दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचा ‘दुर्दम्य आशावाद’ बोलून दाखवला.

कार्यकर्त्यांनी असा विचार करु नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करु शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, येणाऱ्या दोन-तीन महिन्यात राज्यात आपले सरकार स्थापन झालेले असेल आणि तुम्ही सगळे माझे म्हणणे लक्षात ठेवा, असे दानवे म्हणाले. राज्यात सरकार कसे स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. सध्या आम्ही फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची वाट बघत आहोत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार आहोत, हे लक्षात ठेवून काम करायचे, असेही दानवे म्हणाले.

 दुसरीकडे शिवसेनेने लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे, असा इशारा दिला आहे. देशात लव्ह जिहादची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने लव्ह जिहाद विरोधात कायदे करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही असा कायदा करावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

 राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षाचे सरकार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ओळखले जातात. ते अशा कायद्याला पाठिंबा देणार नाहीत, हे भाजपला माहीत आहे. त्यातूनच शिवसेनेची कोंडी होईल आणि हे सरकार पडेल, अशी भाजपला आशा आहे. त्यावरूनच शिवसेनेने भाजपवर टिकेची झोड उठवली आहे.

भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. पश्चिम बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. लव्ह जिहादबाबत भाजपचे गृह राज्यमंत्री यांनी संसदेत या संकल्पनेला कायद्यात कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून अद्याप या प्रकरणी एकही गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही. लव्ह जिहादची व्याख्या आधी ठरवावी लागेल. ती व्याख्या योगीजी आणि शिवराजमामांनी ठरवली आणि देशाने स्वीकारली असे होणार नाही, असे सांगत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपच्या दुटप्पीपणावर टिकेची झोड उठवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा