सरकार तीन पक्षांचे असले तरी शिवसेनाच काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा वरः खा. संजय राऊतांचे वक्तव्य

0
167
संग्रहित छायाचित्र.

पुणेः राज्यात तीन पक्षांचे सरकार असले शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी) वर आहे. ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याचे सरकार असते. हे ठाकरे सरकार आहे. दुसऱ्या कोणा मंत्र्यांच्या नावाने सरकार ओळखले जात नाही, हे आपले सरकार आहे. ही आपली पॉवर आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. खा. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे  राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. त्यात भर पडत असते ती नेत्यांच्या वक्तव्यांमुळे. त्या वक्तव्यात आता संजय राऊत यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

 पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड- शिरूरच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्याच्या राजकारणातील शिवसेनेचे महत्व अधोरेखित करताना खा. राऊत म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याचे सरकार असते. हे ठाकरे सरकार आहे. दुसऱ्या कोणा मंत्र्यांच्या नावाने हे सरकार ओळखले जात नाही. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे, असे राऊत म्हणाले.

हे सांगत असतानाच खा. राऊत म्हणाले की, अर्थात महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि नेते आपलेच आहेत. अजितदादा आपले आहेत. शरद पवार तर आपलेच आहेत. पवार साहेब देशाचे नेते आहेत. देशाचे नेतृत्व त्यांनीच केले पाहिजे असे आम्ही वारंवार म्हणत असतो. अनेक जण सरकारमध्ये आहेत. दिलीप वळसे-पाटील आहे. पण शिवसेना सगळ्यांच्या वर आहे. शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते. काँग्रेसला लागते, राष्ट्रवादी लागते आणि भाजपलाही लागते. ही आपली पॉवर आहे, असे राऊत म्हणाले.

 यावेळी संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेलाही उत्तर दिले. खंजीर खुपसणे म्हटले की पहिले नाव शरद पवारांचे यायचे, आता मात्र उद्धव ठाकरेंचे येते, अशी टीका पाटलांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांना मी चंपा म्हणणे बरोबर नाही. ते म्हणाले आमचे १०५ आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही… त्यांना वाटले ते येतील, पण आले नाहीत. आम्ही समोरून कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडे काम कधी शिकवले नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही. शब्द तुम्ही फिरवला, आम्ही नाही, असे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा