शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन, बक्षिसांची लयलूट!

0
52
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने ‘योद्धा@ ८०’ शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मला एक लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.

शरद पवारांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपटाच्या माध्यमातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावी व आताच्या काळातील फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून पवारांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा ‘योद्धा @ ८० – अजूनी चालतोची वाट’  या शॉर्टफिल्म स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत तरूण तरुणींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना आपली निर्मिती जगासमोर आणण्याची मोठी संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या विश्वस्त खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यभरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात, असे खा, कोल्हे म्हणाले.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म ठरणाऱ्या कलाकृतीस करंडक, प्रमाणपत्र तसेच रोख १,००,००० रुपये मिळणार आहेत. द्वितीय पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ७५,००० तर तिसरे पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ५०,००० असणार आहे.

या पारितोषिकांव्यतिरिक्त अन्य पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. ती अशीः

 एकूण १२ विशेष पारितोषिके: विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई (एमएमआरडीए विभाग) विभागातील प्रत्येकी एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक व याव्यतिरिक्त या ६ विभागातील महिला दिग्दर्शकांच्या ६ निवडक शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिके, प्रमाणपत्र व १०, ०००  रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

दोन विशेष पारितोषिके: महाराष्ट्रातील सहा प्रादेशिक विभागांव्यतिरिक्त महाराष्ट्राबाहेरील प्रवेशिका असलेल्या एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक तसेच एलजीबीटी घटकातील एका दिग्दर्शकास ज्युरी पसंतीने निवडलेले विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व र१०, ००० रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

प्रेक्षक पसंतीची तीन पारितोषिके: सुप्रिया सुळे या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक लाइक्स मिळवणाऱ्या पहिल्या तीन शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व १०, ००० रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल.

या स्पर्धेचा निकाल शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवशी म्हणजेच १२ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात येईल व नंतर पुढील काळात पारितोषिक विजेत्या सर्व शॉर्टफिल्मचे मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष स्क्रिनिंग करून पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी विषय असेः

१)महिला विकासात शरद पवारांचे योगदान. २) फुले-शाहू-आंबेडकर : पुरोगामी विचारांचे पाईक शरद पवार. ३) शरद पवारांचे कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय योगदान. ४) महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात शरद पवारांचे योगदान. ५) कला-साहित्य-संस्कृती : रसिकाग्रणी शरद पवार. ६) क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ : शरद पवार. ७) आपत्कालीन नैसर्गिक प्रसंगातील संकटमोचक : शरद पवार. ८) महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील संस्थात्मक उभारणीचे आधारस्तंभ: शरद पवार. ९) लोक माझे सांगाती : मा. शरद पवार. १० ) शरद पवार: एक समग्रदर्शन

या स्पर्धेत जास्तीत जास्त ३ मिनिटे कालावधीची शॉर्टफिल्म स्विकारली जाईल.चित्रपट निर्मात्यांनी/दिग्दर्शकांनी आपल्या शॉर्ट फिल्मच्या प्रवेशिका गुगल ड्राईव्ह लिंकसह सोबत दिलेल्या प्रवेशिका अर्जासोबत rwtshortfilm@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या दोन्ही वेबसाइटवर डाऊनलोड करिता उपलब्ध आहेत. स्पर्धकांना १२  नोव्हेंबर २०२० पासून ५ डिसेंबर २०२० पर्यंत शॉर्टफिल्म स्पर्धेकरिता पाठवता येतील. शॉर्टफिल्म दिग्दर्शकास वयाची कोणतीही मर्यादा नाही.

प्राप्त झालेल्या शॉर्टफिल्म प्राथमिक निवड प्रक्रियेमधून जातील आणि निवडलेल्या शॉर्टफिल्म सर्व जनतेसाठी सुप्रिया सुळे यु-ट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/c/supriyasulencp) अपलोड केल्या जातील.

यास्पर्धेत शॉर्टफिल्म सादर करण्यासाठी प्रवेश फी असणार नाही. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क : १) महेश हरबक – ९८३४६०२४४९  (२) सुबोध जाधव – ९८२३०६७८७९ (३) सागर राऊत –  ७९७२९३७९९३ यांना संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा