‘रिव्हर्स’ मेगाभरती पळवणार भाजप-शिवसेनेच्या तोंडचे पाणी, महायुतीतील असंतोष आज उद्रेकात बदलण्याची चिन्हे !

मेगाभरती फेम भाजप-शिवसेनेत खदखदत असलेल्या असंतोषाचे रुपांतर उद्रेकात होऊन त्यांना आज 'रिव्हर्स' मेगाभरतीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

0
562
संग्रहित छायाचित्र.

कौशल दिपांकर /मुंबई

 गेले दोन-तीन महिने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांची आपल्या पक्षात मेगाभरती करून राज्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याची स्वप्ने बघणाऱ्या भाजपबरोबरच शिवसेनेलाही आज ‘रिव्हर्स मेगाभरती’चा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस येऊन ठेपला तरी उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप- शिवसेनेतील अनेक विद्यमान नेत्यांबरोबरच उमेदवारीच्या आशेने त्या पक्षात दाखल झालेले नेतेही पर्याय शोधत आहेत. त्यामुळे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत होणारी रिव्हर्स मेगाभरती भाजप- शिवसेनेच्या तोंडचे पाणी पळवण्याची दाट शक्यता दिसू लागली आहे.

 भाजपने जाहीर केलेल्या चौथ्या यादीबरोबच महायुतीतील भाजपचा 150 जागांचा कोटा संपला आहे. मुक्ताईनगरमधून शेवटच्या क्षणी तरी उमेदवारी मिळेल, या आशेवर असलेल्या एकनाथ खडसेंचा पत्ता कट करून भाजपने त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. ‘मी का नको, हे पक्षाने सांगावे’, अशी विचारणा वारंवार करूनही खडसेंना उत्तर न देताच भाजपने त्यांच्या कन्येला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर खडसे समाधानी होतात की कन्येची उमेदवारी नाकारून स्वतंत्रपणे मैदानात उतरतात, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. त्यातच गेले तीन महिने खडसे आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारीच केला होता. या संपर्कातील खरेखोटेपणाही आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.

भाजपने पत्ते कट केलेले 14 विद्यमान आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. विनोद तावडेंसारख्या आघाडीच्या नेत्याचीही उमेदवारी कापून भाजप नेतृत्वाने घडी घातल्यामुळे नाराजीत आणखीच भर पडली आहे. पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर यासारख्या महानगरात एकही जागा न देऊन भाजपने शिवसेनेला पूर्णतः हद्दपार करून टाकल्यामुळे शिवसैनिकांतही मोठी नाराजी आहे. तब्बल 20 शहरी भागात भाजपने शिवसेनेच्या हाती भोपळा दिला आहे. शिवसेना नेतृत्वाने भाजपशी केलेली ही तडजोड शिवसेनेत ह्यात घालवणाऱ्या शिवसैनिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. हा असंतोष आणि तिकिटाच्या आशेने भाजप- शिवसेनेत गेलेल्यांचा झालेला हिरमोड ‘रिव्हर्स मेगाभरती’ला खतपाणी घालत आहे. त्याची झलक गुरूवारीच मराठवाड्यात पहायला मिळाली. उस्मानाबादेतील उमेदवारीच्या आशेने भाजपत गेलेले डॉ. प्रतापसिंह पाटील, शिवसेनेचे संजय निंबाळकर, संजय दुधगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना आणि आमदारकीचा आजच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. औरंगाबाद जिल्हयातील शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष माने गुरूवारीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. नांदेडमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर अस्वस्थ आहेत. औरंगाबाद,बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातही अशाच रिव्हर्स मेगाभरतीची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप- शिवसेनेत वाहू लागलेले असंतोषाचे वारे आज उद्रेकात बदलण्याची शक्यता आहे. हा उद्रेक भाजप- शिवसेनेचे राजकीय आडाखे बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे जाणकारांना वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा