आज रौप्य महोत्सवी नामविस्तार दिन: विद्यापीठ गेटवर परिवर्तनवाद्यांची मोठी गर्दी, अमाप उत्साह

0
79
छायाचित्र सौजन्यः विकीपिडीया

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी नामविस्तार दिन आज हर्षोल्हासात साजरा करण्यात येत आहे.महाराष्ट्राच्या इतिहासालाच कलाटणी देणाऱ्या प्रदीर्घ संघर्षानंतर 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला होता. महाराष्ट्रातील परिवर्तनवाद्यांच्या लढ्याच्या फलिताला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आंबेडकरी जनतेत अमाप उत्साह असून आज सकाळपासूनच विद्यापीठ गेटवर अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यात उच शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे 1958 मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्रातील परिवर्तनवाद्यांनी प्रदीर्घ संघर्ष केला. महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याच्या इतिहासात सुवर्ण पान ठरलेला नामांतर लढा अखेर 14 जानेवारी 1994 रोजी फलदायी ठरला आणि विद्यापीठाचा नामविस्तार झाला. त्या नामविस्ताराला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आज सकाळपासूनच विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, नामांतर शहीदस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वसामान्य आंबेडकरी जनतेबरोबरच विविध संस्था, संघटनानी गर्दी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत महावीर जोंधळे यांचे नामविस्ताराच्या मूळाशी… या विषयावर विशेष व्याखान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर रिपाइं नेते रामदास आठवले, पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, भीमशक्तीचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी शाहीर, गायकांनी सकाळपासूनच विद्यापीठ गेटवर आंबेडकरी स्फूर्ती गीतांचे सादरीकरण सुरू केले आहे. विद्यापीठ गेटवर होणारी गर्दी लक्षात घेता मिलिंद कॉलेज चौक ते विद्यापीठ गेट हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा