औरंगाबादच्या नामांतरावर गायकाचा भाजपला खोचक सवालः काय साहेब, लोक मुर्ख वाटतात का?

0
147
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ झालेच पाहिजे, अशी भूमिका घेणाऱ्या भाजपवर प्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी सडकून टीका केली आहे. पाच वर्षे सत्तेत असताना नाव बदलले नाही आणि सत्तेतून बाहेर पडताच काही महिन्यांत सर्कस सुरू केली. लोक तुम्हाला मुर्ख वाटतात का? असा खडा सवाल दादलानी यांनी केला आहे.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत आलेल्या भाजपला एकदाही औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करावे असे वाटले नाही. आता सत्तेतून बाहेर पडल्यावर औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने हा मुद्दा उकरून काढला आहे. गेली कित्येक वर्षे हा मुद्दा शिवसेनेचा होता. नेमकी हीच बाब हेरून विशाल दादलानी यांनी भाजपवर टीका केली आहे.

पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात, तेव्हा नाव बदलले नाही. आता सत्तेपासून दूर होऊन काही महिने झालेत आणि सर्कस सुरू झाली. काय साहेब? लोक मुर्ख वाटतात का? असा खोचक सवाल दादलानी यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद दौऱ्यात आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झालेच पाहिजे, असे म्हटले होते. त्यावर तुम्ही नेमके कोणाचे वंशज आहात, हे सांगायला हवे, असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर जोरदार टीका केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा