धनंजय मुंडेंवरील बालंट टळलेः रेणू शर्मांने मागे घेतली बलात्काराची तक्रार, शरद पवार म्हणाले…

0
1766
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला असून बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या गायिका महिलेने त्यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त आहे.

रेणू शर्मा या महिलेने तक्राच मागे घेतल्यामुळे हे प्रकरण आता आपोआपच बंद होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तपास अधिकाऱ्यांनी रेणू शर्माला शपथपत्रावर तिचा जबाब दाखल करण्यास सांगितले होते. हे शपथपत्र नोटरी करण्यासही सांगितले होते. सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत होते. रेणू शर्माने सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाबही नोंदवला होता. मात्र नोटरी केलेल्या शपथपत्रावर जबाब नोंदवावा, म्हणजे पुढच्या टप्प्यात तिला त्याचा इन्कार करता येणार नाही, असे रेणू शर्माला तपास अधिकाऱ्याने सांगितले होते, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

हेही वाचाः आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणार ३० टक्के कपात!

गेल्या कित्येक दिवसांपासून आपली मोठी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध सौहार्दपूर्ण नव्हते, त्यामुळे मी मानसिक दबावाखाली होते, असे रेणू शर्माने तपास अधिकाऱ्यासमोर जबाबात लिहून दिले आहे. रेणू शर्माच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते आणि तिच्यापासून आपल्याला दोन मुलेही आहेत, असे धनंजय मुंडे यांनीच रेणू शर्माच्या आरोपानंतर कबुल केले होते.

हेही वाचाः आता रेणू शर्मा म्हणतेः माझ्याकडे धनंजय मुंडेंचे ना आक्षेपार्ह फोटो, ना व्हिडीओ!

आपल्या तक्रारीची बातमी माध्यमात धडकल्यानंतर आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी विरोधी राजकीय पक्ष आपल्या तक्रारीचा वापर करत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे. मी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेत आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात माझी बलात्काराची तक्रार नाही, असे रेणू शर्माने तपास अधिकाऱ्याला सांगितले.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह संपूर्ण भाजप नेत्यांनी मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

रेणू शर्मा या महिलेने स्वतः होऊन तक्रार मागे घेतलेली असल्यामुळे आता या प्रकरणाचा तपास गुंडाळण्यात येणार आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आम्ही तिच्या तक्रारीचा आम्ही तपास करत होतो. आता तक्रारच नसल्यामुळे हे प्रकरण आपोआपच बंद होते, असेही हा अधिकारी म्हणाला.

शरद पवार म्हणाले- आम्ही बरोबर होतोः दरम्यान, या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही प्रतिक्रिया आली आहे. आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे, असे मी आधीच म्हणालो होतो. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झाले आहे, असे शरद पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा