
बीडः बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे एका छायाचित्रामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हातात एके-47 बंदूक घेतलेले साध्या वेशातील छायाचित्र त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी पोस्ट केले आहे. शस्त्र हातात घेतलेली छायाचित्रे सोशल मीडियावर टाकू नये असे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे आदेश असतानाही त्यांनी हे छायाचित्र पोस्ट केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर केली जाऊ लागली आहे.
हर्ष पोद्दार यांनी ब्रिटिश चीव्हनिंग स्कॉलरशिपवर इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले असून जगातील नामांकित क्लिफर्ड चान्स या कॉर्पोरेट लॉ फर्ममध्ये त्यांनी बॅरिस्टर म्हणून काम केले आहे. एका कॉर्पोरेट बॅरिस्टर म्हणून काम केलेल्या एका जिल्हा पोलिस अधीक्षकांनीच वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून एके-47 हातात घेवून साध्या वेशातील छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हर्ष पोद्दार नावाच्या या फेसबुक प्रोफाइलवर ‘आम्ही घेतो काळजी महिला व मुलींची’ असा संदेश देणारा ‘पोलिस कवच’ हा कव्हर फोटो आहे. 3 डिसेंबर रोजी पोस्ट केलेल्या या कव्हर फोटोमध्ये बीडच्या पोलिस नियंत्रण कक्षाबरोबरच महिला मदतीकरिता व्हॉट्सअप क्रमांक देण्यात आला असून हर्ष ए पोद्दार, ( भा. पो. से.) पोलिस अधीक्षक, बीड, असाही उल्लेख आहे. पोलिस दलात कार्यरत असलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे हाती घेतलेली छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असे आदेश दत्तात्रेय पडसलगीकर हे पोलिस महासंचालक असताना जारी करण्यात आले होते. असे असतानाही हर्ष पोद्दार यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील हे छायाचित्र पाहून अनेक नेटकरी सवाल करू लागले आहेत. एखाद्या व्यक्तीने हातात शस्त्र घेऊन फोटो अथवा व्हीडीओ शेअर केला तर त्यांच्यावर कारवाई होते. पोलीस विभागात उच्च पदस्थ अधिकारी अशा प्रकारचे शस्त्रप्रदर्शन करत असतील तर ते कोणत्या कारणासाठी? हर्ष पोद्दारांना पदाची दहशत दाखवायची का ? असे अनेक सवाल नेटकरी सोशल मीडियावर करू लागले आहेत. विशेष म्हणजे हर्ष पोद्दार या फेसबुक प्रोफाईलचे अबाऊट हाइड करण्यात आलेले आहे. त्यामुळे हे फेसबुक प्रोफाइल बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे अधिकृत फेसबुक प्रोफाइल आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.