५ नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस पुन्हा औरंगाबादकरांच्या सेवेत!

0
89
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी येत्या 5 नोव्हेंबरपासून स्मार्ट सिटी बस सुरु करण्यात येत असल्याची घोषणा आज पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली.

देसाई यांनी आज महानगरपालिकेच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे, सहायक आयुक्त सुमंत मोरे, अपर्णा थेटे, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मुख्य लेखाधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.

औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे. येत्या ५ नोव्हेबरपासून स्मार्ट बस सुरु होत असल्याने नागरिकांना वाहतुकीची स्मार्ट सुविधा मिळणार आहे, असे देसाई म्हणाले.

यावेळी मनपातर्फे कोरोना काळात सुरु केलेल्या उपचार सुविधा येत्या काळात सुरु ठेवण्याची सूचना देसाई यांनी केली. मेल्ट्रॉन रुग्णालय मनपाकडेच राहील. तेथे आणखी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील प्रमुख रस्त्यासह इतर सर्व रस्ते दुरुस्ती ,जालना रस्त्याला समांतर रस्ता करणे आदी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

शहरातील गुंठेवारी वसाहतीतील नागरिकांना मालकी हक्क व सिडकोच्या मालमत्ता नियमित करण्याबाबतचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरे मिळणे, नवीन पाणीपुरवठा योजना, सिध्दार्थ गार्डनमधील विकास कामे, मिटमिटा परिसरात विकसित केल्या जाणाऱ्या सफारी पार्कला जागतिक पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित करण्याबाबत सूचित करुन इतर महत्वपूर्ण कामांचा आढावाही देसाई यांनी यावेळी घेतला.

मिटमिट्यातील सफारी पार्कचे काम तीन टप्प्यांतः  मिटमिटा परिसरातील सफारी काम तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात ६० हेक्टर जागेवर संरक्षक भिंत, प्रवेश व्दार, सपाटीकरण करणे  या कामाची सुरवात तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणी, शहरातील रस्त्याच्या कामाची नोव्हेबरमध्ये सुरुवात करण्यात येणार आहेत. सफारी पार्क येथील उर्वरित जागेवरील १७ हेक्टरवर’लायन सफारी’ करण्याबाबत आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे, अशी माहिती पांडेय यांनी दिली.

संत एकनाथ नाट्यगृहाचे काम डिसेंबरपर्यंतः १ नोव्हेंबर ते दिवाळीपर्यत शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत असून शहराला स्वच्छ सर्वेक्षणात  पहिल्या १० शहरात स्थान मिळवून देण्याचा मानस आहे. संत एकनाथ रंगमंदिर नाटयगृहाचे काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. संत तुकाराम नाटयगृहाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असल्याचे पांडेय म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा