बलात्काराच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी सोडले मौन, नेमके काय घडले त्याचा केला खुलासा

0
1628
संग्रहित छायाचित्र.

मुंबई समाजमाध्यमांवर एका महिलेने माझ्याविरोधात केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे, निराधार आणि माझी नाहक बदनामी करणारे आहेत. या महिलेने माझ्यावर बलात्‍काराचे खोटे आरोप ब्‍लॅकमेल करण्याच्या हेतूने केले असून या संदर्भातील प्रकरणात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्‍ट असल्‍याने मी यावर अधिक भाष्‍य करणार नाही. प्रसारमाध्यमांनीही यावर अधिक भाष्‍य करणे टाळावे, अशी भूमिका  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्‍टद्वारे मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु होताच धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे आपली बाजू मांडली आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना माहिती आहे. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांत या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत, असे मुंडेंनी म्हटले आहे.

ब्लॅकमेल करुन पैशाची मागणीः  २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे, असे मुंडे म्हणाले. करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे, असेही मुंडेंनी सांगितले.

ब्लॅंकमेलिंगचे पुरावेः करुणा शर्मा यांच्या बहिणीने माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व तक्रारी खोट्या आहेत. करुणा शर्मा, त्यांची बहीण व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे. माझ्याकडे तक्रारकर्त्‍या महिलेने त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे पुरावे आहेत असेही धनंजय मुंडे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा