सामाजिक न्याय विभाग करणार समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्राची चौकशी, नोकरीवर गंडांतर?

0
919
संग्रहित छायाचित्र.

पुणे/मुंबईः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर प्रकाश झोतात आलेले आणि वादाचा विषय ठरलेले एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेऊन कुणी तक्रार केली तर सामाजिक न्याय विभाग त्या तक्रारीच्या आधारे समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राची चौकशी करेल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी भारतीय महसूल सेवेत नोकरी मिळवली आणि एका मागासवर्गीयाचा अधिकार हिरावून घेतला, असा आरोप मलिक यांनी केला आहे. याबाबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप घेतला, त्याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार केली तर आम्ही या प्रकरणाची चौकशी करू, असे धनंजय मुंडे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी आज दिली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकांचा पुनरूच्चारः समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि धर्म लपवण्याचा खेळ २०१५ पासून वानखेडे कुटुंबाने केला. त्यातूनच वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली, असा दावा नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा केला आहे.

 समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांच्या कुटुंबातील सर्व जण मुस्लिमच होते. समीर यांनी जातीच्या बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली. २०१५ पासून जातीबाबतची वस्तुस्थिती त्यांनी लपवली. फेसबुक प्रोफाइलवर जिथे दाऊद वानखेडे उल्लेख होता, तिथे  डी.के. वानखेडे असे लिहायला सुरूवात केली. त्यानंतर वडिलांचे जे जुने नाव ज्ञानदेव होते, ते लिहायला सुरूवात केली. नोकरी धोक्यात येईल हे लक्षात आल्यावर नाव बदलण्याचा खेळ यांनी घरात सुरू केला. दाऊदचे ज्ञानदेव केले. बहिणींचे नाव बदलले. पहिले लग्नही याच याच कारणातून मोडले. असा दावा मलिक यांनी केला. वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा