भाजपच्या आयटी सेलनेच ‘हँडल’ केला निवडणूक आयोगः माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप

0
104
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया हाताळणीचे कंत्राट भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करणे अपेक्षित असताना निवडणूक आयोगाने भाजपची यूथ विंग असलेल्या भाजयुमोच्या आयटी सेलच्या राष्ट्रीय संयोजकाला देणे ही बाब लोकशाहीच्या मुलभूत तत्वांना धक्का पोहोचवणारी असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाचे फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी फेसबुकवर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी Chief Electoral Officer Maharashtra या नावाने पेज सुरु केले होते. या पेजवर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक जाहिराती देण्यात आल्या होत्या. सदर पेज तयार करताना वापरकर्त्याने पुढील पत्ता दिला होता. ‘२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई’ हा पत्ता कोणाचा आहे याचा शोध घेतला असता पुढील गोष्टी प्रकाशात आल्या, असे चव्हाण म्हणाले. 

फडणवीस सरकारने सरकारच्या प्रसिद्धीच्या जाहिरातीचे काम ‘साईनपोस्ट इंडिया’ नावाच्या एका जाहिरात कंपनीस दिले होते. हा पत्ताही या साईन पोस्ट कंपनीचा आहे. हाच पत्ता ‘सोशल सेंट्रल’ नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारेदेखील वापरला गेला आहे. ही कंपनी देवांग दवे याच्या नावावर असून तो भाजपच्या यूथ विंगच्या (भाजयुमो) आयटी आणि सोशल मीडियाचा राष्ट्रीय संयोजक आहे. देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याचे समोर येते. ही पेजेस भाजपचा प्रचार करणारी असून विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवला जातो. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून केले असल्याचे त्याच्या वेबसाईटवरून समोर येते, असे चव्हाण यांनी सांगितले.

घटनेच्या कलम ३२४ अनुसार निवडणुकांबाबतचे अधीक्षण, निर्देशन व नियंत्रण हे निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणुका निष्पक्ष आणि निर्धोक वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. परंतु वरील घटनेवरून असे निदर्शनास येत आहे की, महाराष्ट्र निवडणूक आयोग आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत आहे. उपरोक्त घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती मी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली आहे, असे चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा